प्रेरणादायी मुलाखत: विजय पाटील
November 27, 2020
विजय पाटील हे सेवा सहयोगमध्ये समन्वयक म्हणून काम करतात. नुकताच त्यांनी कोरोनावरील लसीच्या चाचणीसाठी पुढाकार घेत १ डोस घेतलासुद्धा …. जाणून घेऊया, या कोरोना योद्ध्याबद्दल…..
तुमच्या मूळगाव आणि बालपण याविषयी सांगा ना ?
जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील तळवाडे या ७०० – ८०० लोकसंख्या असलेल्या लहानशा गावात माझं बालपण गेलं. माझं गावं हे फारसं उद्यमशील वैगेरे नसून तिथे व्यवसायाची मोठी कमतरता आहे. सर्व लोक शेतकरी असून त्यांच्याकडे असलेल्या शेतीवर त्याचं जीवन चालत. इथे पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने भरपूर छोटे मोठे व्यवसाय इथले शेतकरी करतात. पण आमच्या गावाकडे फक्त पावसाळ्याचे ४ महिने पाऊस पडेल तेवढ्याच काळात शेतकरी पिक घेतो. एखाद्याकडे पाण्याची सोय असेल तर तो काहीतरी भाजीपाला वैगेरे पिकवतो. माझे वडील शेतकरी आहेत, आई सुद्धा त्यांना शेतीकामात मदत करते. माझा लहान भाऊ सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेतोय.
गावात राहून समाजकार्याची ओढ कशी लागली ?
खरंतर मी गावात ५ वर्षे सरपंच म्हणून काम केलं आहे. १२ वी चे शिक्षण संपल्यावर गावासाठी काहीतरी चांगल काम करता यावं म्हणून मी राजकारणात उतरलो. या पाच वर्षात मी गावाला २५ लाख रुपये रकमेच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यासाठी निधी मिळवून दिला. गावातील गटारी साफ करणे, गावातील रस्त्यांचे बांधकाम करणे इ. काम केली. गावातील या ५ वर्षांचा अनुभव फार छान होता. बरेच राजकीय डावपेच शिकायला मिळाले. परंतु हव्या त्या प्रमाणात विकासकामांचा अनुभव नव्हता. गावात राहून ते अनुभव मिळणे कठीण होते. गावामध्ये जर का विकास घडवायचा असेल तर शहरात जाऊन त्याचा अभ्यास करून नंतर आपल्याला ते शक्य होईल, आणि त्यासाठीच मी पुण्यात आलो होतो.
तुम्हाला ग्रामविकास आणि शहरी वस्त्यांमधील विकास यातील फरक काय जाणवला ?
शहरातील आणि गावातील सर्वात मोठा फरक म्हणजे शहरात एखादे विकासकाम पूर्ण होईल तेंव्हा कुठे गावात त्याची सुरुवात झालेली असते. शहरातील विकासकामांचा वेग खूप असतो. शहरात एखादा रस्ता ८ दिवसात दुरुस्त होत असेल तर गावात त्याच कामाला किमान एक महिना जाईल. त्यामध्ये निविदा मागवणे, कंत्राट देणे आणि प्रत्यक्ष काम या सर्वच गोष्टींना वेळ लागतो. इथे खूप मोठ्या प्रमाणात कंत्राटदार आहेत, गावाकडे मात्र त्याचं प्रमाण खूप कमी आहे. माझ्यामते शहरात गेलेल्या गावातील व्यक्तींनी जर लोकांना माहिती दिली तर योजना अंमलबजावणीसाठी लागणारा वेळ कमी होईल.
तुम्ही कोरोनाच्या लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून पुढाकार घेतलात, आम्हाला अतिशय कौतुक आहे, या निर्णयाबद्दल, प्रक्रियेबद्दल सांगा ना ?
कोरोना संकटात जेंव्हा लॉकडाऊन केलं गेलं तेंव्हा मी पुण्यातच होतो. ह्या संकटाच्या काळात सेवा सहयोगने आपण काम करीत असलेल्या काही वस्त्यांमध्ये कोरोना तपासणी केली. जेंव्हा आम्ही जहांगीर वस्तीमध्ये कोरोना तपासणी केली त्यावेळी अतुलजींनी सांगितले कि ही एक खूप मोठी लढाई आहे, आणि त्यामध्ये आपण काहीतरी योगदान दिले पाहिजे. त्यावेळी मी ठरवलं आपण काहीतरी करायला हवं. पण आपण काही डॉक्टर वैगेरे नाही कि आजारी लोकांची सुश्रुषा करू, किंवा एखादी लस तयार करू शकू. मला पूर्वीपासून सर्दीचा त्रास आहे. माझा त्रास बघून एका मित्राने सुचवलं कि तू भारती हॉस्पिटलमध्ये जा. तिथेच मला डॉ. ललवाणी भेटले ते माझ्या मित्राचे नातेवाईक होते. त्यांनी मला लसीविषयी सविस्तर माहिती दिली आणि विचारलं कि तू या लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून नाव नोंदवशील का ? मी त्यांना होकारही दिला पण त्यांनी सुचवलं कि एकदा घरच्यांना सुद्धा विचार त्याचं मत काय आहे. मी सरळ घरी सांगू शकत नव्हतो कारण गावाकडे कोणताही बदल लगेच स्विकारण्याची मानसिकता नसते. म्हणून मी आपल्या ऑफिसला येऊन शैलेशजींना भेटलो, त्यांना औपचारिक माहिती दिली. त्यांनी मला माधुरी ताईंना विचार असं सुचवलं. नंतर मी माधुरी ताईंना विचारलं तेंव्हा त्यांनी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या एका मैत्रिणीचा संपर्क क्रमांक दिला. मी त्यांच्याशी संपर्क साधला तेंव्हा त्या म्हणाल्या तू लस घेऊ शकतो त्यापासून तुला फार काही त्रास होणार नाही. मी लस घेतली, तेंव्हा आपल्याला काही होईल अशी भीती वाटली नाही. घरच्यांना जेंव्हा कळलं तेंव्हा त्यांनी विरोध दर्शवला. तू असं का केलं ? काय गरज होती ? त्यावेळी मी त्यांना समजावून सांगितले कि ह्यामुळे मला फार काही त्रास होणार नाही. याची मी डॉक्टरांकडून चौकशी केलेली आहे. प्राण्यांवर यशस्वी झाल्यानंतरच मानवी चाचणी केली जात आहे इत्यादी माहिती घरच्यांना दिली.
मुलं, पालक, आणि इतर आपल्या मित्रांसाठी काय संदेश द्याल ?
सर्वांनी लसच घ्यावी असं काही नाही, पण सामाजिक कामात योगदान नक्की दिल पाहिजे. सर्वांनी मास्क लावा, सॅनिटाझरचा वापर करा, हात स्वच्छ धुवा, सामाजिक अंतर पाळा. घरी राहा गर्दीत जाणे टाळा. खरंतर मी या कामाचं श्रेय सेवा सहयोगलाच देईल कारण मी इथे काम करतांना ज्या गोष्टी शिकलो त्यामुळेच ही लस घेण्याचं धाडस मी करू शकलो.