प्रेरणादायी मुलाखत: सुमनताई मोरे
November 27, 2020
कचरावेचक ते एका संस्थेच्या अध्यक्ष असा स्तिमित करणारा सुमन ताईं चा जीवन प्रवास. अनुभव समृद्ध शिदोरी, परदेश वारीतील अनुभव या सर्व गोष्टी जाणून घेऊ या मुलाखतीद्वारे…
नमस्कार सुमनताई, तुम्ही मूळच्या कुठल्या?
माझं माहेर बीड जिल्ह्यातलं आणि सासर उस्मानाबाद जिल्ह्यातलं. 11, 12 वर्षांची असताना लग्न झालं आणि पुण्यात आले, निगडीत आत्ता जेथे अप्पूघर आहे तिथे वस्ती होती, तिथे राहायला होते.
अच्छा म्हणजे तेव्हापासून तुम्ही पुण्यात आहात.. तेव्हा काय काम करायच्या तुम्ही?
लग्नानंतर जेव्हा पुण्यात आले तेव्हा काम मिळणं तसं कठीण होतं, ओळखी नव्हत्या त्यामुळे घरकाम मिळत नव्हते आणि कागदपत्र नव्हते त्यामुळे नोकरीधंदा मिळत नव्हता त्यामुळे एक दिवस मी पोतं घेऊन कचरा वेचायला जायचं ठरवलं कारण दुसरा काही पर्याय नव्हता. रोज सकाळी कचरा वेचून रात्री तो विकून जेवणाचं सामान आणून स्वयंपाक करत असे.
हे काम करताना तुमचा अनुभव काय होता?
तेव्हा काम करताना माझा अनुभव फारसा चांगला नव्हता, लोकं आम्हाला इतर नागरिकांसारखी वागणूक देत नसत, कचरा उचलतांना कपडे घाण व्हायचे तर लोकं दुरून नाक दाबून निघून जात..तुच्छतेची वागणूक मिळत होती. नंतर मी बाबा आढाव यांची कागद, काच, पत्रा कष्टकरी संघटनेची सभासद झाले, तिथे आमच्या काही अडचणी समजून घेतल्या, सोडवल्या जात. त्यांनी आमच्यासाठी पतपेढी देखील चालू केली, तिथे आम्ही महिना 50 या प्रमाणे बचत करीत असू.
तुम्ही वयाच्या 12व्या वर्षी पासून काम करता, मग तुमचा पुढचा प्रवास कसा होता?
पुढे हेच काम जरा चांगल्या पद्धतीने करावे म्हणून मी स्वच्छ च्या सोबतीने महानगरपालिकेसोबत बैठक केली, मग महानगरपालिकेने कचरावेचकांसोबत 5 वर्षाचा करार करायचा असे ठरवले.
स्वच्छच्या अंतर्गत तुम्ही काय काम करता, कामाचं स्वरूप काय असतं?
साधारण 3600 महिला स्वच्छच्या अंतर्गत काम करतात, दारोदारी जाऊन कचरा गोळा करणे, त्यातून ओला आणि सुका कचरा वेगळा करणे आणि मग तो कचरा महानगपालिकेच्या घंटागाडीला देणे असे काम प्रामुख्याने चालते. त्यात ओल्या कचऱ्यापासून कंम्पोस्ट खत तयार करणे, ते उद्यानांना देणे, सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून पुनर्निर्मितीसाठी देणे असे काम स्वच्छ करते, त्यातून पर्यावरण सुरक्षित राहायला मदत होते. या सर्व कचरावेचक महिला हातगाडीवर काम करत असल्याने कचरा उचलणाऱ्या गाड्यांची संख्या कमी झाली तुलनेने वाहतूक कमी झाली.
या कचरावेचक महिलांबद्दल काही सांगाल का?
या सध्याच्या कोरोना काळात एकही कचरावेचक महिला घरी बसली नाही, उलट आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं होतं की सगळी लोकं घरी सुरक्षित राहिली पाहिजेत. त्यासाठी आपण रोज कामावर गेलं पाहिजे. कारण कचरा साचला की घाण होणार आणि त्यातून अजून रोगराई पसरणार.. त्यामुळे सर्व महिला गेले 7-8 महिने सातत्याने कामावर आहेत.
म्हणजे कोरोना योद्धे आहात तुम्ही सगळ्या… तुम्ही स्वच्छ संस्थेत सभासद कसे करून घेता??
स्वच्छ मध्ये कागद, काच, पत्रा सहकारी संस्थेतील सभासद गरजेनुसार घेतले जातात, कारण त्यांना तिकडे काम करून कामाची कल्पना आलेली असते. त्यामुळे काम सोपे जाते. आणि जर एखादी महिला वृद्ध असेल तर तिच्या घरच्यांना किंवा नातेवाईकांना प्राधान्य दिले जाते.
साधारण किती वर्षे तुम्ही हे काम करताय?
गेले 25 वर्ष मी हे काम करत आहे. यातून मुलांचे शिक्षण, लग्न, सगळं काही झालं. कागद, काच, पत्रा मध्ये कचरावेचकांना बिनव्याजी कर्ज दिले जाते व ते आम्ही कामातून फेडतो. आधी लोक आमच्याकडे बघून चोरीचा आळ घेत असत, घालून पाडून बोलत होते. परंतु, कागद, काच, पत्रा आणि स्वच्छमुळे आम्हाला मान मिळाला, लोकांची आमच्याकडे बघण्याची दृष्टी बदलली, आता अगदी आवर्जून घरात बोलवून चहा, नाश्ता विचारतात काही सोसायटीमधून सत्कार करतात.
वा! म्हणजे स्वच्छमुळे तुम्हाला मान मिळाला..
हो, मी कागद, काच, पत्रा मध्ये काम करत असताना ऑफिस झाडायला जायचे, एकदा ताप सर्दी झाली म्हणून 4-5 दिवस गेले नाही, परत कामावर गेले तेंव्हा झाडून घेताना झेरॉक्स मशीन खालून झाडू काढला तर 500 च्या नोटांचे बंडल बाहेर आले, मी चिडले तिथल्या कॅशिअरला म्हणाले की ” माझं मन बघायला असं करता का तुम्ही, माझं मन बघायला म्हणून कराल आणि खरंच कोणी घेऊन गेलं तर आळ माझ्यावर यायचा, मला कामच नाही करायचं तुमचं” अशी खूप बडबड केली. तेंव्हा ते कॅशिअर म्हणाले मावशी चिडू नका थांबा कालच पोलीस येऊन आमची झडती घेऊन गेलेत पैसे मिळाले नाही तर आज आम्हाला घेऊन जाणार आहेत.. मग पोलिसांना बोलावलं त्यांनी माझी चौकशी केली आणि त्या कॅशिअरची पण चौकशी केली. मी सांगितलं मी काही 4 दिवस कामाला नव्हते. ते दिसलेले पैसे ठेऊन न घेता पोलिसांना दिल्यामुळे वस्तीतील इतर बायकांनी मला फार वेड्यात काढलं, तेंव्हा माझं चटई, बांबूचं घर होतं त्यामुळे मला त्या पैशातून घर होईल असे म्हणत होत्या. तेव्हा माझा मोठा मुलगा तिसरीत होता तर तो म्हणाला,” आम्ही कष्टाचा 1 रुपया कमवू पण आम्हाला हे फुकटचं आणि चोरीचं नको” तेव्हा बायका “आई येडी ते येडी हे पोरगं पण तसलंच” असे म्हणत निघून गेल्या.
अच्छा.. आणि स्वच्छ मध्ये काम करताना असे काही अनुभव?
हो, तिकडे काम करत असताना एका सोसायटीत कचरा जमा केल्यानंतर एक बाई नाकातला हिरा हरवला म्हणून शोधत आणि रडत आली. हिरा होता महागाचा… पन्नास हजारांचा होता, आईने दिलेला होता, तिची आठवण होती असे म्हणून ती रडत होती. तिथल्या कचरा वेचणाऱ्या बायकांनी माझ्याकडे येऊन सांगितलं की असं झालेलं आहे. आणि आता आपल्याला कचऱ्यातून हिरा शोधावा लागणार आहे. तेव्हा त्यांच्यासमोर एक पांढरं स्वच्छ पोतं पसरलं. त्यावर सगळा कचरा खाली केला त्यातून कागद, पिशव्या बाजूला काढून सर्व बारीक कचरा खाली पसरला आणि त्यातून ती हिऱ्याची नाकातली मोरणी शोधून त्या बाईला दिली. तसं तिचं रडणं थांबलं. तिने आमच्या सगळ्यांच्या हातात शंभर शंभर रुपये घातले की तुमच्या चहापाण्यासाठी वगैरे पण मी काही ते घेतले नाही. कारण तो माझ्या कष्टाचा पैसा नव्हता त्या शंभर रुपयाने माझं असं कुठे पोट भरणार होतं.. असे अनेक अनुभव आले किती लोकांनी बऱ्याच वेळा शंका घेतल्या आणि चुकीचे आरोप केले कमीपणाची वागणूक दिली..
तुमचा प्रामाणिकपणा तुम्हाला एवढं वर घेऊन गेलाय आणि ताई तुमचं शिक्षण?
काहीच नाही
काहीच नाही ? आणि मी ऐकले की तुम्ही चार-पाच देश फिरून आलात हे कसं साध्य केलं ?
सध्या मी स्वच्छ संघटनेची सदस्य आहे. त्यामुळे एकदा त्यांनी मला सांगितलं की तुला ह्याच कामाच्या अंतर्गत नेपाळला जाऊन यायचं आहे, तिथे कचरा गोळा करून जाळत होते. त्यामुळे प्रदूषण होतं, तर तिथे मला कचरा व्यवस्थापन हा विषय सांगायचा होता. तेव्हा मला नेपाळ कुठे आहे हे माहिती नव्हतं. मला वाटलं इथेच कुठेतरी जाऊन यायचं आहे आणि मुलगा सुनेने पण नाही सांगितलं की नेपाळ म्हणजे एवढे लांब आहे वगैरे. त्यांनी सांगितलं जमेल तुम्हाला आणि जाऊन या म्हणून. जाताना संघटनेची स्नेहा म्हणून मुलगी होती माझ्या सोबत पण येताना मी एकटीच होते. मग नेपाळहून दिल्लीला आले दिल्लीहून येथे लोहगावला आले, जाताना पहिल्यांदाच विमानात बसत होते म्हणून थोडी भीति वाटली आणि येताना एकटीच होते सोबत नव्हती पहिल्यांदाच एकटीने प्रवास करत होते म्हणून काळजी वाटत होती.
दिल्लीला विमानतळावर त्यांनी फॉर्म भरायला लावला होता. तो होता इंग्लिशमध्ये, मला काही इंग्रजी वगैरे येत नाही. आसपासच्या लोकांना विचारलं मग तुमच्या सारख्या एक बाईने विचारलं की मावशी भरून देऊ का फॉर्म ? मी म्हणलं हो बाई, दे भरून तेवढं. तिने मला फॉर्म भरून दिला आणि मग दिल्लीहून लोहगाव पर्यंत आले.
असा झाला तुमचा पहिला विमान प्रवास… बरं मग पुढे?
त्यानंतर गेले साऊथ आफ्रिकेला, तिकडे जाताना येताना दोन्ही वेळा सोबत होती. तिकडे पर्यावरणाची परिषद होती. सगळ्या देशातून लोक आले होते, खूप लोक होते. त्यानंतर गेले जिनिव्हाला. तिकडे कॉन्फरन्स होती पण तिकडे जाताना पौर्णिमाताई सोबत होत्या, मात्र येताना एकटंच परत यायचं होतं, त्यांना वाटलं की मी नेपाळहून एकटी आले म्हणजे जिनिव्हावरून पण एकटं येऊ शकेन म्हणून त्यांनी सांगितलं जाताना पौर्णिमाताई आहेत येताना तुम्ही एकटया या. परत येताना मला विमान बदलून प्रवास होता मग परत येताना स्विझर्लंडला उतरले आणि मग भारतात परत आले आणि मग पुढच्या वर्षी जाताना त्यांनी माझंच नाव सुचवलं कारण त्यांना विश्वास बसला की ही एकटी जाऊन येऊ शकते म्हणून पुढच्याही वेळी मला एकटीलाच पाठवण्यात आलं. पण जाताना हर्षद म्हणून एक दादा मुंबईहून होते पण परत येताना मात्र मी एकटीच होते. मग स्विझर्लंडला विमान बदललं आणि परत भारतात येणार होते स्विझर्लंडला उतरल्यावर सगळ्या पाट्या इंग्रजीतून, बोलणारी माणसं इंग्रजीतून, मला काही इंग्रजी येत नाही म्हणून मी लोकांना तोडक्या-मोडक्या शब्दात आपला काहीतरी विचारत होते. पण लोक इंग्रजीतून उत्तर देत होते व शेवटी मी त्यांना म्हणाले “नो इंग्लिश” मग माझं बोलणं ऐकून मला मुंबईला जायचं आहे हे समजून घेऊन मुंबईच्या काऊंटरपाशी आणून बसवलं तर तिकडे एक मुंबईचे दादा होते त्यांच्या आईला परत भारतात आणून सोडत होते त्यांनी मला साडीत वगैरे पाहिलं त्यांना कळालं मला मुंबईला जायचंय, त्यांनी विचारलं तुम्ही एकट्याच का? सोबत कोणी नाही का ?? मग मी त्यांना म्हणलं जाताना सोबत होते पण आता येताना मी एकटीच जाते. तर म्हणाले, “हो लोक असेच करतात कामाला म्हणून घेऊन येतात आणि जाताना असंच सोडतात” मी त्यांना म्हटलं नाही नाही कामाला नाही मी मीटिंगसाठी आले होते पर्यावरणाची कॉन्फरन्स होती. त्यांचा विश्वासच बसेना, माझ्याकडे सगळी कागदपत्र होती ती मी त्यांना दाखवली. त्यांना आश्चर्यच वाटलं. ते म्हणाले मावशी फोटो काढून घेऊ का तुमचा… माझा एक फोटो काढून घेतला आणि मग आलो आम्ही परत. इकडे आल्यावर त्यांनी पेपरला बातमी लिहिली आणि मग नंतर लोकांना कळालं वेगळ्यावेगळ्या चॅनलची लोकं सगळे घरी यायला लागले. माझ्या बातम्या वेगवेगळ्या चॅनलमध्ये टीव्हीवर आल्या आणि मग लोकांना काम कळलं.
म्हणजे त्या मुंबईच्या दादांमुळे सुमनताई सगळ्यांना कळल्या म्हणायचं तर.. बरं, तुमची मुले काय करतात?
माझा मोठा मुलगा पत्रकार आहेत 15 वी पर्यंत शिक्षण झालं त्याचं पुढचं काय शिकला आहे ते काय मला सांगता येत नाही आणि लहाने दोन मुलं कंत्राटदार आहेत. आणि मुलीचं लग्न झालंय, आम्हाला दोघांनाही अक्षर ओळख नव्हती काही शिक्षण नाही त्यामुळे मी ठरवलं की किमान पाचवीपर्यंत तरी मुलांना शिकवायचं, पुढचं ते बघून घेतील. आवड निर्माण झाली तर शिकतील नाही तर बघतील. आसपासच्या नातेवाईकांच्या मुलांकडे बघून बघून मी मुलांना शाळेत घातलं. संध्याकाळी कामावरुन आले की स्वयंपाक करता करता त्यांना म्हणायचे अभ्यास करा, अभ्यास करा. मला अक्षर ओळख नाही त्यामुळे अभ्यास करतात की नाही हे मला कळायचं नाही, पण मी अभ्यास करा म्हणलं की काहीतरी रेघोट्या ओढत बसायचे. तेवढाच काय तो त्यांचा अभ्यास. पण, मुलं शिकली मुलांना अभ्यासाची गोडी लागली, आधी मोठा शिकला, मोठा शिकत गेल्यावर त्यांनी लहान पोरांचा अभ्यास घेतला असं करून तिन्ही पोरं चांगली जिद्दीने शिकून आता चांगल्या पदावर चांगलं काम करतात. कचरावेचक म्हणून आमच्या मुलांना शाळेत घेत पण नव्हते, त्यांच्यामुळे इतर मुलांना वाईट वळण लागेल असं म्हणत होते. कचरा वेचणाऱ्या बाईची मुलं म्हणून संस्थेच्या लोकांनी येऊन मध्यस्थी करून मुलांना शाळेत दाखला मिळवून दिला, शाळेत पण सगळे मुलं रोज डबा, खाऊ आणायचे. पण माझ्या पोरांना असं व्हायचं नाही कारण मी कचरा वेचून तो विकून संध्याकाळी काहीतरी स्वयंपाक करायचे. मग सकाळी त्यांच्या मधल्या सुट्टीच्या वेळेस मी चहा घेऊन जायचे तांब्यात आणि तेव्हा बटर मिळायचे ते घेऊन जायचे. बाहेर बसून चहा बटर खाऊ घालायचे आणि मग पोरं पुढची शाळा करायचे.
ताई तुम्ही एवढं काम करून, कष्ट करून मुलांना घडवलंय, नाव कमवलंय… आपल्या अभ्यासिकेतील मुलांना काय सांगाल तुम्ही?
प्रत्येकाने शिकायला पाहिजे आई-वडिलांनी जरी शाळेत घातलं तरी त्याचा आई-वडिलांना काहीच फायदा नसतो. ते मुलांचं भविष्य घडवत असतात, त्यामुळे प्रत्येकाने शिकून स्वतःच कल्याण करायला पाहिजे.
मुलाखतकार व शब्दांकन
सायली काटेकर