Back to Blog

प्रेरणादायी मुलाखत: निलेश धायरकर

November 27, 2020

वस्तीमधूनचं  पुढे येऊन आज एका सामाजिक संस्थेत पूर्णवेळ कार्यकर्ते असा प्रेरणादायी प्रवास या मुलाखतीतून जाणून घेऊ.

तुम्हाला MSW करावं असं का मनात आलं ? किंवा समाजकार्य करावे हे कसं काय मनात आलं ?

 MSW करावं किंवा त्या आधी स्वरूपवर्धिनीच्या माध्यमातून समाजकार्य करावं ह्यामागे दोन प्रमुख कारण होती. एक म्हणजे माझी स्वतःची “आई”, आणि दुसरी म्हणजे आम्ही जिला आई मानतो ती “स्वरूपवर्धिनी”. स्वरूपवर्धिनीचा मुळातच उद्देश राहिला आहे, की सेवा देणे आणि सेवाकार्यातून असे काही सेवेकरी निर्माण करणे जे समाजातील कोणतंही लहान मोठं सेवेच काम करतील. माझी आई धुणी – भांडी करायची. धुणी भांडी करतांना तिची प्रामाणिकता ही खूप असायची, कधी कधी मी तिच्यासोबत जायचो. काही फ्लॅट असे असायचे जिथे मालक राहत नव्हते त्याचं असं मत होतं की आठवड्यातून एकदा येऊन सफाई करायची. ते वर्षभर तिथे राहायला यायचे नाही पण तरीही आई नियमित सफाईला जायची. व्यवस्थित धूळ साफ करणे, शौचालये साफ करणे. बऱ्याचदा काही फ्लॅटमध्ये मुर्त्यां-खाली पैसे ठेवलेले असायचे त्यावेळी मला त्याचा अर्थ कळत नव्हता. तरीही आम्ही तेथील सर्व साफसफाई करायचो आणि ते पैसे परत जिथल्या तिथे ठेवायचो. जेंव्हा वर्षभरानी त्या फ्लॅटचे मालक परत आले आणि त्यांनी ते पैसे जसेच्या तसे बघितले तेंव्हा त्यांनी आईचे खूप कौतुक केले, आणि सांगितले की, आम्ही हे पैसे ठेऊन तुझी परीक्षा घेतली. पण इथल्या पाच, दहा, आणि शंभर रुपयांच्या नोटांना तू हातसुद्धा लावला नाहीस त्यामुळे तू इथे राहिलीस तरीही आम्हाला काही अडचण नाही. तिचा कामतला हा प्रामाणिकपणा मी ७ वी, ८ वी मध्ये असतांना बघितला. त्यानंतर मी स्वरूपवर्धिनीमध्ये जायला लागलो, तिथे माझं वक्तृत्व फुलत गेलं. त्यानंतर मी स्वरूपवर्धिनीमध्ये अनेक शिबिरे, सहलीमध्ये सहभागी झालो. शिबिरातून मुलांना कसं घडवावं हे स्वरूपवर्धिनीचे ध्येय स्पष्ट असल्याने शिबिरातील प्रत्येक कार्यक्रम ध्येयाला जोडून असायचा. रक्षाबंधन आले की आमचं ठरलेलं असायचं की वृद्धाश्रमात जाणे, अनाथाश्रमात जाणे. या कार्यक्रमांमधून जी संधी मिळत गेली त्यातून कुठंतरी एक विचार मनात आला की या क्षेत्रात आपण काही करू शकतो का ? तर मग मी ज्या वस्तीत राहतो त्यासाठी काहीतरी करावं, दुसऱ्या वस्तीसाठी, नंतर तिसऱ्या वस्तीसाठी असं करत करत आज आम्ही ७० वस्त्यांपर्यंत पोहचलो आहोत. मी हे एकटा जरी करत नसलो तरी त्याचा भाग होता आलं. कारण या कामाला स्वरूपवर्धिनीने गती दिली, दिशा दिली, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक विचार दिला सेवेकरी होण्याचा, मी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करतो. परंतु माझ्यासारखेच आणखी लोक आहेत जे स्वरूपवर्धिनीमध्ये काम करतात. स्वरूपवर्धिनीसोबत विस्तारक म्हणून काम करत असतांना जाणवलं की आपल्यामध्ये आणखी काही कौशल्ये आणि माहिती असायला हवी, म्हणून मी MSW केलं. मला MSW न करता सुद्धा पूर्णवेळ काम करता आले असते परंतु स्वरूपवर्धिनीमध्ये पूर्णवेळ काम करणाऱ्यांपैकी कुणीही MSW केलेलं नव्हतं. नवीन जगाची भाषा आपण शिकलो पाहिजे त्यामुळे काळानुसार बदलणारी कौशल्ये आणि शिक्षण आपण अवगत केलं पाहिजे आणि त्याचा वापर आपल्या कामात केला पाहिजे. 

स्वतः काहीतरी करण्यासाठी आजच्या मुलांनी प्रामुख्याने युवकांनी कोणती कौशल्ये आत्मसात करावीत?

मुळात कौशल्ये मिळवण्यापूर्वी कुठल्या जाणीवा विकसित झाल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टीत आपण संवेदनशील झालं पाहिजे. मुलांनी जर कान आणि डोळे उघडे ठेवले तर काही गोष्टी कळतील. मी ज्यावेळी १० वी ला होतो त्यावेळी चौकातून जेंव्हा शाखेत जायचो तेंव्हा तिथे इस्त्रीवाल्या ज्या बाई होत्या त्या मला नेहमी म्हणायच्या गंजाड्याचा मुलगा कीती शिकणार ? कारण माझे वडील गांजा, दारू ह्याचं व्यसन करत होते. ते मला माझ्या वडील आणि काकांवरून गंजाडी म्हणायचे. कौशल्ये ही मिळवता येतील, परंतु मी कोण आहे ? याची जाणीव होणे स्वतःची ओळख होणं आणि त्या ओळखीचा परीघ वाढत जाणं. लहानपणी जे भगतसिंगाला कळलं की जालियनवाला बागातील माती मी घरी नेली पाहिजे कारण इथे जे रक्त सांडलं ते माझ्याच देशबांधवांचं आहे. सुरुवातीला मला असं वाटायचं की दारुड्याचा मुलगा असणं हा आपल्याला लागलेला शिक्का आहे. त्यामुळे कोणतंही काम करतांना माझा तो पिंड आहे का ? माझी ती आवड आहे का ? मी त्या कामाला प्रामाणिकपणे करू शकतो का ? जीवनातील आलेल्या अनुभवातून आणि घडलेल्या गोष्टींमुळे आपल्याला समजतं. मी स्वरूपवर्धिनीमध्ये काम करत असतांना देखील माझे वडील रोज घरी दारू प्यायचे. घरी येऊन त्यांना बघून असं वाटायचं की कीतीही कौशल्ये मिळवली आणि आपण बाहेर लोकांना सांगत असलो की दारू पिऊ नका तरीही माझ्या वडिलांची दारू काही सुटेना. खूप प्रयत्न करून तीन वर्षापूर्वी मी ती सोडवली. एकदा का तुमच्या जाणीवा विकसित झाल्या तुमची स्वतःची ओळख झाली की मग तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात जायचं, त्यामध्ये सामाजिक क्षेत्र असो, उद्योग क्षेत्र, पत्रकारिता, प्रशासन क्षेत्र असो त्या क्षेत्राचे शिवाजी तुम्हाला होता आलं पाहिजे असं “ज्ञापू” म्हणायचे ज्ञापू म्हणजे ज्ञानेश पुरंदरे. शिवाजी म्हणजे ढाल तलवार घेऊन घोड्यावरून चालले असं नाही तर तू जो विषय हाती घेतला त्या विषयातील शिवाजी होता आलं पाहिजे. शिवाजी महाराजांकडे कोणती कौशल्ये होती त्याआधी त्यांच्याकडे कोणते गुण होते आणि ते स्वतःत कसे विकसित होतील याचा विचार समुत्कर्ष प्रकल्पातील मुलांनी करायला हवा. त्यासाठी चांगली पुस्तके, चांगले व्यक्ती आणि भेटी यामधून स्वताला समृद्ध करणं आणि त्यातून उत्कर्षाकडे जाणं हे गरजेच वाटतं. कौशल्याआधी जाणीवा आणि गुणांचा विकास यावर सर्वच मुलांनी भर द्यायला हवा.

 

तुम्ही वाचलेली पुस्तके किंवा अनुभव ज्यातून तुम्ही समृद्ध झालात..    

स्वरूपवर्धिनीत वाढदिवसाच्या दिवशी संकल्प करतात अशी एक प्रथा आहे, तीन संकल्प करायचे. मग कोणी १० % मार्क वाढवणार, कोणी पुस्तक वाचणार असे संकल्प करायचे. ७ वी मध्ये असतांना जेंव्हा मी स्वरूपवर्धिनीत नवीन होतो, तेंव्हा मी संकल्प केला की मी पुस्तके वाचेन. पण त्यावेळी माझ्याकडे पुस्तके नव्हती. काहींकडे काही मासिकं, दिवाळी अंक येतात पण आपल्याकडे वस्ती विभागात पेपरसुद्धा येत नाहीत. वाचन हा विषय आमच्याकडे अभ्याक्रमातील पुस्तकांपलीकडे काहीही नव्हता. परंतु स्वरूपवर्धिनीचं ग्रंथालय खूप समृद्ध होते, तर ७ वी ८ वी मध्ये आम्ही चित्रांची पुस्तके वाचायला सुरुवात केली आणि तिथनं वाचायला सुरु झालेला पुस्तकांचा शोध. वाचनातील आवड निर्माण व्हायला जि गती मिळाली ती छोटे छोटे प्रकल्प करायला सांगितले जायचे त्यांनी. मला आठवतं की, मी ९ वीत असतांना लादेनने अमेरिकेवर हल्ला केला होता. त्यावर आम्हाला प्रकल्प करायला सांगितला होता. त्यासाठी आम्ही ग्रंथालयात गेलो. मग कोण लादेन ? काय अमेरिका ? यामधून विविध विषयांवरती वाचनाची जी सवय आणि आवड निर्माण झाली. मी ११ वी ते पदवी पूर्ण होईपर्यंत जवळ जवळ ३५ पुस्तके वाचली. यामध्ये पु.ल. देशपांडे, प्र.के. अत्रे, भीमराव कस्ती, अनेक ग्रामीण आणि दलित लेखक यांची विविध पुस्तके वाचली. एकदा वाचतांना मला विश्वास पाटलांच वेड लागलं, महानायक, झाडझडती इ. मला खूप लोकांनी सांगितले की विविधता जपली पाहिजे. मग मी काही प्रबोधनपर चित्रपट बघितले. सोबतच ७०-८० लोकांना भेटायची संधी सुद्धा मला या काळात मिळाली. माणसं देखील आपल्याला वाचता आली पाहिजे. एकदा मला स्वरूपवर्धिनीने ज्ञानप्रबोधिनीच्या यशवंत लेले ह्यांच्याकडे पाठवले, त्याचं मराठी बोलणं, त्यांची इंग्रजीमधील हातोटी, त्यांचा रामायण,महाभारतातील अभ्यास, ते बघून मी गोष्टी शिकत गेलो. वाचनं, पाहणं, ऐकणं, अनुभवणं ह्या ज्या शिक्षणाच्या पद्धती आहेत त्या आपण करत राहिल्या पाहिजे ज्यामुळे आपल्या जाणीवा आणि समृद्धता गतीने वाढत जाते.

शाळेचा अभ्यास, मित्रांसोबत खेळणं या गोष्टींमधून तुम्ही पुस्तक वाचनासाठी कसा वेळ काढला ?  

खरंतर वस्तीतील पालक मुलांना जरी अभ्यास कर म्हणत असतील तरीही तो बघण्यासाठी ते कधीच हजर नसतात. ते घरी नसणं ही मुलांना फार मोठी संधी वाटते, पण खरंतर त्या संधीचा फायदा चांगल्या गोष्टींसाठी कसा करता येईल याचा विचार केला पाहिजे. मी जर का वाचनाची सवय लावून घेतली नसती तर मी आज वक्ता झालो नसतो. वाचन झालं,वक्ता झालो, मग मला विविध विषयांचा अभ्यास करण्यासाठी प्रेरित करण्यात आलं. मी वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला. वेळेचा सदुपयोग केला नसता तर मला हे करता आलं नसतं. शिबिरांमध्ये आम्हाला वेळेच नियोजन दाखवायचे, संघाचं प्रथम, द्वितीय शिबीर जेंव्हा मी केलं तेंव्हा आम्हाला वेळेचा सदुपयोग कसा करावा हे शिकवलं. शिरीष पटवर्धन, ज्ञानेश पुरंदरे हे रिकाम्या वेळेत देणगीदारांना, कार्यकर्त्यांना पत्र लिहत बसायचे त्यातून रिकाम्या वेळेचा सदुपयोग करायला मी शिकलो. आणि त्याचा फायदा मला MSW च्यावेळी झाला. मी अर्धवेळ नोकरी करायचो, कॉलेज, फिल्ड वर्क आणि ५ ते ११ काम करून सुद्धा मी माझ्या वर्गात चारही सत्रात प्रथम क्रमांक मिळवला. वेळेचं गणित बसवणं आणि अधिकाधिक अभ्यास, वाचन, लोकांच्या भेटी हे सगळं करता येतं, मुलांनी हे ठरवलं पाहिजे की माझ्या २४ तासाचं सोनं करता आलं पाहिजे. नाहीतर कुणी आपल्याला कोळसा म्हणून चुलीत टाकायला सुद्धा वापरणार नाही. आपण जेंव्हा स्वतःच्या वेळेची कदर करायला लागतो तेंव्हा लोक आपली कदर करतात. एखाद्याला जर का वाटलं का हा पूर्ण वेळ रिकामाच असतो म्हणजे संपलं. ATM कसं २४ तास उपलब्ध असतं तर लोकं म्हणतात की जाऊ संध्याकाळी, जाऊ रात्री पण बँक मात्र ८ तासंच चालू असल्यामुळे वेळेतच जाऊन कामं केली पाहिजेत. तुमची वेळ तुम्हाला पाळता आली पाहिजे आणि लोकांनी तुमच्यासाठी वेळ काढला पाहिजे. काल आम्ही वा. न. अभ्यंकर म्हणून ज्ञानप्रबोधिनीच निगडीच काम ज्यांनी सुरु केलं. त्यांची ९० व्या वर्षी मुलाखत घ्यायला जेंव्हा आम्ही १०:१५ ला पोहचलो आणि आमची भेटण्याची वेळ १०:३० ची होती. आम्ही विचारणा केली तेंव्हा तेथील शिपायाने सांगितले की तुम्हाला दिलेल्या वेळेच्या ५ मिनिटाआधी ते हजर असतील. जर एवढे वयस्कर असूनही ते वेळ पाळत असतील तर आपण का पाळू नये ? लोकांना भेटा, वाचन करा, चित्रपट बघा छान हुंदडा पण हे सर्व आपल्याला कुठे घेऊन जातंय ह्याचा विचार नक्की करा. आपण जी पुस्तके वाचतोय ती योग्य आहेत का ? कुठला चांगला चित्रपट बघू शकतो ? कुठल्या व्यक्तीशी भेटू शकतो ह्याविषयी आपल्या सेवा सहयोग मधील ताई दादांशी नक्की मैत्रीपूर्ण संवाद साधा. तुम्ही जर का हा मैत्रीपूर्ण संवाद साधला तर इथे तुमच्या पाठीशी उभे राहणारे आणि योग्य मार्गदशन करायला भरपूर लोकं मिळतील. 

अभ्यास आणि प्रचंड वाचनाची आवड असतांना तुम्ही खेळाला कधी वेळ दिला का ? 

अजूनही मी खेळतो मी एक चांगला व्हॉलीबॉल खेळाडू आहे, माझे मित्र देखील तुम्हाला हे सांगतील कारण मी त्याला खूप वेळा हरवलेलं आहे. मुळात शाखेत खेळायला मिळालं नसतं तर कदाचित मी शाखेत गेलोच नसतो. सतत खेळत राहिल्याने तुमची फिटनेस चांगली राहते त्यामुळे भरपूर खेळा. सर्व काही प्रमाणात असावे, जास्तीचे काही नसावे ज्यामुळे आपलं काम चांगलं होईल. रोज किमान १ ते दीड तास खेळलंच पाहिजे, घाम हा गाळलाच पाहिजे. आपल्याला क्रिकेटच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. आपल्याला एखाद्या संघाचा, क्लबचा, शाखेचा किंवा अभ्यासिकेचा भाग होता आले पाहिजे. १० वी पर्यंत तुम्ही किमान ५ किल्ले तरी चढले पाहिजेत. पर्वतीची टेकडी तर ५ मिनिटात चढता आली पाहिजे. तळजाई ते वाघजाई ते पर्वती ही चढाई आपण केली पाहिजे. एखाद्या बुकेमध्ये जसे वेगवेगळी फुले लावल्यामुळे तो छान दिसतो अगदी तसंच खेळ, वाचन, झोपणे, चांगले पदार्थ खाणे, त्यांचा आस्वाद घेणे, आराम हे सर्व ठरवून आणि व्यवस्थित केलं पाहिजे. 

आई आणि स्वरूपवर्धिनी व्यतिरिक्त तुमचं प्रेरणास्थान कोण ?

आईकडून मी प्रामाणिकपणा तर स्वरूपवर्धिनीकडून मी सेवाभाव शिकलो. कधी कधी प्रेरणास्थान म्हणून कुठली एक व्यक्ती नसते तर बऱ्याच लोकांकडून काहीना काहीतरी शिकायला मिळत असतं. १० वी ला शिकत असतांना आम्हाला एक शिक्षिका होत्या वर्तक मॅडम, त्या फक्त शाळेत शिकवत नव्हत्या तर जि मुले अर्धवेळ नोकरी करत त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी जाऊन मुलांना काम करू नकोस अभ्यास कर असं सांगायच्या एवढंच नव्हे तर त्या मुलांना पैशाच्या स्वरुपात मदत सुद्धा करायच्या. नेहमी काहीतरी गुण मिळवण्याची संधी शोधायला पाहिजे. प्रदीपदादा रावत ह्यांच्याकडून मी एक विज्ञाननिष्ठ माणूस कसा असावा हे शिकलो. त्यातून मी जीवनातील व्यवहार्यता शिकलो. एखाद्या व्यक्तीला प्रेरित कसं करायचं हे मी ज्ञानेशजी पुरंदरे यांच्याकडून शिकलो. कसा संवाद साधायचा ? कुठे काय पेरायचं ? नेहमी आशावादी कसं राहायचं ? हे त्यांच्याकडून शिकलो. मला रॉजर फेडररचा खेळ आवडतो म्हणून मी त्याची मॅच कधी चुकवत नाही. एखादी व्यक्तीला आयडल न बनवता त्याच्या विषयातील गुण हे घ्यावे, कारण माणूस पूर्णच भारी किंवा पूर्ण नालायक कधीच नसतो त्याच्यातील गुण हे ओळखून आपण घेतले पाहिजेत. 

सेवाभाव असणे म्हणजे नेमकं काय असणे ?

सेवा हा भाव नाही आपला स्वभाव झाला पाहिजे. इथं जि मुले आहेत ती सुद्धा काही कमी सेवाभावी नाही. हे सुद्धा गल्लीत जर का एखाद्या कुत्र्याला लागलं तर त्याला पट्टी वैगेरे बांधतात. त्याला पाणी पाजतात, एखादा पक्षी मेला तर त्याला खड्यात पुरून फुलं बिलं टाकतात. ही संवेदनशीलता आहे, हाच सेवाभाव आहे. आजारी पडल्यावर आईचे पाय चेपणे हा सेवाभाव आहे. रस्त्याला जातांना एखाद्या गाडीच्या धडकेने एखादा कुत्रा घायाळ झाला त्याला रस्त्यावरून बाजूला करून त्याची सुश्रुषा करणे हा सेवाभाव आहे. भरपूर पैसे कमवले आणि ते सामाजिक कामाला दिले हा सुद्धा सेवाभाव आहे. सेवाभाव हा फक्त सामाजिक काम करणाऱ्या माणसाने जपून चालणार नाही हा प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीने जपला पाहिजे. मुळात सेवा हा आपल्या संस्कृतीचाच एक अविभाज्य भाग आहे ( सेवा परमोधर्म ). रतन टाटांनी कोविड संकटात ५०० कोटींची मदत केली. ते उद्योगपती आहेत पण सेवाभाव त्यांच्यात पण आहे. आणि वस्तीत राहणाऱ्या एखाद्या महिलेने जर शेजाऱ्यांना तिच्याकडे असलेले जास्तीचा राशन दिला तर तिचा सेवाभाव सुद्धा रतन टाटांएवढाच आहे. सेवाभाव हा तुमच्या सर्वांमध्ये आहे आणि कित्येकवेळा तुम्ही तो प्रकटही करता. फक्त शेजारच्यांना ते कळत नाही आणि ते तुम्हाला उलट सुलट काहीतरी बोलतात. पण आपलं कार्य करत राहा. शिवाजी महाराजांनी सुद्धा पहिला किल्ला जिंकायला जेंव्हा काही मावळे जमवले तेंव्हा लोकं म्हणायचे ही एवढीशी पोरं काय त्या निजामशाहीशी लढणार. परंतु जेंव्हा महाराजांनी तोरणा जिंकला तेंव्हा सर्वांचे डोळे फिरले आणि स्वराज्याची स्थापना झाली. त्यामुळे माणसं जमवा, प्रामाणिक मैत्री करा, आणि ह्यातून सेवाभाव न करता सेवा स्वभाव करता आलं पाहिजे. 

सामाजिक काम करतांना तुम्हाला कधी राग येतो का ?    

सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला राग न येणं आणि अस्वस्थ न होण हे जमणारच नाही. राजाराम मोहन रॉय यांची वहिनी जेंव्हा सती गेली तेंव्हा त्यांना सुद्धा रागच आला म्हणून सामाजिक बदल घडला. भगतसिंगांना सुद्धा जालियनवाला बाग येथील घटनेचा रागच आला. राग हा आलाच पाहिजे तो माणसाचा अंगभूत गुण आहे. जसं रडू शकतो, हसू शकतो, तसं रागावू सुद्धा शकतो. बिनदास्त रागवता आलं पाहिजे फक्त दुसऱ्यावरती प्रकट होता कामा नये. राग आल्यानंतर कसा व्यक्त करतो ते महत्वाचं आहे. बाहेर शौचास जर कुणी बसत असेल तर त्याचा राग आला पाहिजे. आणि त्याच रुपांतर स्मार्ट सिटी प्रकल्पात झालं तर खूप मोठा बदल होईल. कधी कधी कार्यकर्त्यांमध्ये आपण जीव टाकतो, मुलांवर इन्वेस्ट करतो तरीही अपेक्षित परिणाम होत नाही, निराश वाटतं ते स्वीकारता आलं पाहिजे. हे मी मला करायचं होत म्हणून केलं ही भावना ठेऊन गोष्टी सोडून देता आल्या पाहिजे आणि पुढे जाता आलं पाहिजे. रागाच सकारात्मक दडपण आपल्यावर असलं पाहिजे. जसं की जर सभा चालू असतांना जर एखाद्याचा मोबाईल वाजला आणि मी त्याला रागावलो तर परत कोणतीही सभा असतांना माझा मोबाईल कधी वाजू नये याची काळजी मला घेता आली पाहिजे. 

मुलांसाठी संदेश 

आपण बऱ्याचवेळा परिस्थितीला दोष देतो. वडील व्यसनी आहेत, आई धुणी भांडी करते, घर लहान आहे. काहींना तर घरच नाहीत तरीही ते मोठ मोठे कवी आणि लेखक झालेत. त्यामुळे आपण वस्तीत राहत असलो आणि आपल्या घरात समस्या असल्या तर तुमच्यासाठी ही एक संधी आहे. तुम्हाला प्रगतीच्या हिमालयाची वाटचाल करण्यासाठीची ती संधी आहे. त्यामुळे परिस्थितीच भांडवल करू नका. त्रास सर्वांना आहे पण त्याची जाणीव असणे, त्याविषयी संवेदनशील असणे, आणि त्यात परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्नशील असणे हे गरजेच आहे. आपले व्यक्तिमत्व अधिकाधिक समृद्ध  कसे होईल त्याच्यासाठी प्रयत्नशील राहा, त्यासाठी चांगलं वाचा, भरपूर लोकांशी मैत्री करा, भरपूर फिरा, चांगल्या कामामध्ये कार्यरत व्हा, ह्याच परिवर्तन सेवा सहयोगी होण्याकडे झालं पाहिजे. तुम्ही कोणाचेतरी सहयोगी झाला पाहिजे, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या घरच्यांचे  सहयोगी होता आले पाहिजे ? मग आपल्या वस्तीत सहयोगी होता आलं पाहिजे असचं आपला सेवा सहयोगी होण्याचा परीघ वाढवता आला पाहिजे. हे तुमच्या वयात करणं सहज शक्य आहे,  शिवाजी महाराजांनी ह्याच वयात स्वराज्याची शपथ घेतली, संत ज्ञानेश्वरांनी तर समाधीकडे वाटचाल केली. अडचणींची मस्त एक भिंत करा, त्यावर चढा आणि त्यावर उभं राहून जगाला सांगा की ह्या सर्वांवर मात करून मी ह्यावर उभा आहे. हे करण शक्य आहे आणि ह्याची भरपूर उदाहरणे आपल्याला पुण्यातील वस्ती विभागात दिसतात.

Previous post

प्रेरणादायी मुलाखत: सुमनताई मोरे

Next post

प्रेरणादायी  मुलाखत: योगिता आपटे

Subscribe to our blog