Back to Blog

निर्मल वारी- अनुभवाची शिदोरी!

September 29, 2025

तीन वर्षांपूर्वी चिंचवड ते कासारवाडी असा अगदी वीतभर म्हणावा असा वारीमार्ग पालखीबरोबर चालण्याचा योग काही मित्रांमुळे जुळून आला आणि “The proof of pudding is in the eating” हे अगदी पटलंच. दरवर्षी सामाजिक माध्यमांवर अनेकांनी काढलेली वारीची छायाचित्रे पाहिली होती. तरी प्रत्यक्षात पताका, तुळशीवृंदावनं, नाना वाद्य याचबरोबर काखोटीला बाचकी मारून मुखाने अखंड हरिनाम, ग्यानबा तुकारामचा गजर करत झरझर पंढरीची वाट चालणारे वारकरी पाहणे हा एक वेगळाच मंत्रमुग्ध करणारा अनुभव होता. आपण पुण्यात राहतो तर वर्षांत एक दिवस तरी हे अनुभवलंच पाहिजे हा विचार मनात पक्का झाला.

पंढरपूरची पायवारी ही साडे सातशे वर्षांपासूनची आपली परंपरा. अगदी परकीय आक्रमणे, स्वातंत्र्यलढा, रोगराई, दुष्काळ, अतिवृष्टी, कशाकशानेही म्हणे कधी यात खंड पडला नव्हता. पण गेली दोन वर्ष कोरोनामुळे सर्व सामान्य जनतेला पायवारी करता आली नाही. सहाजिकचं नियमित वारकऱ्यांना यंदा वारीची जास्तच ओढ लागली असणार. तीच तऱ्हा आम्हा हौश्या गौश्यांचीही. यंदा सेवासहयोगच्या निर्मल वारीत स्वयंसेवक होण्याचा योग आला आणि मागच्या दोन वर्षांची भरपाई झाली.

निर्मल वारी आयोजकांनी आमच्या दहा जणांच्या गटाची नेमणूक सासवड एस्टी स्टॅंडवर केली होती. पालखी, दिंड्या आदल्या दिवशीच सासवडल्या पोहोचलेल्या होत्या. इथे पालखीचा दोन रात्री मुक्काम असतो. आम्ही मुक्कामाच्या दुसऱ्या रात्री १०ः३०च्या सुमारास तिथे पोहचलो. पालखीचा मुक्काम अगदी एस्टी स्टॅंडच्या समोरच होता. एस्टी स्टॅंडचा सर्व परिसर दिव्यांनी उजळून निघाला होता.

कुठल्याही दिंडीत सहभागी नसलेले एकांडे वारकरी, आजीबाजूच्या गावातून मिळेल त्या वाहनाने किंवा पायी वाट तुडवत पालखीच्या दर्शनाला आलेली भक्त मंडळी एस्टी स्टॅंडच्या आतबाहेर जागा मिळेल तिथे लवंडली होती. खाली एक चादर, अंगावर एक चादर आणि डोक्याखाली लहानसं बाचकं इतकंच काय ते प्रत्येकाचं सामान.. ते बघून आमच्या आर्ध्या दिवसासाठी आणलेल्या सॅक्स अजूनच जडावल्या. एस्टी स्टॅंडच्या मागच्या विस्तीर्ण जागेत शे-दोनशे फिरते संडास, त्यांच्या वापरासाठी लागणाऱ्या पाण्याचा टॅंकर, पाण्याची ५/७ पिंप, असंख्य छोट्या बादल्या, मैला वाहून नेणारे टॅंकर्स, फिरते संडास पुढच्या मुक्कामी नेणारे ट्रक्स असा सारा निर्मल वारीचा जामानिमा पसरलेला होता ही सर्व व्यवस्था चालवणारे कर्मचारी एकमेकांची चेष्टा मस्करी करत काही ना काही कामं करत होते.

“माऊली, संडासचा वापर करा” हे आयोजकांनी सांगितलेलं वाक्य मनात घोकत आम्ही तो सगळा परिसर फिरून नीट पाहून घेतला. वारकरी माऊलींच्या आणि वारी मार्गावरच्या गावांच्या आरोग्यासाठी सरकारने फिरत्या संडासांची व्यवस्था निर्मल वारी प्रकल्पांतर्गत केली आहे. माऊलींना संडासाचा वापर करायला प्रवृत्त करणे हे आम्हा स्वयंसेवकांचं काम. पाण्याची, दिव्यांची व्यवस्था असलेले स्वच्छ संडास वापरायला कोणाला प्रवृत्त का करावं लागेल हा आमच्या शहरी मनांना पडलेला प्रश्न! कोणा माऊलीला सूचना द्यायची वेळ आलीच तर ते आपल्याला नीट जमेल ना अशी धाकधुकही मनात होतीच. आयोजकांनी दिलेली शिट्टी खिशात होती, तिचा एकदम आधार वाटला!  

स्टॅंडवरची बहुतांश मंडळी झोपलेली होती. एखादी माऊली कोणी उठून ट्रकच्या मागे अंधाराकडे जायला लागली की आम्ही लगेच सतर्क होत असू. त्यांना संडासचा रस्ता दाखवत असू. “फक्त लघवीच करायची आहे. तर संडासात कशाला जाऊ?” असं म्हणणारे अनेक स्त्री-पुरूष भेटले. कदाचित पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या गावातून आलेल्यांना लघवीसाठी संडासचा वापर करण्याची सवयच नव्हती. फिरते संडास दिसतात फारच अधुनिक. शिवाय त्यांना खिडक्या नाहीत. त्यामुळेही लोकांना ते वापरण्याचे दडपण वाटते.

 इथे दिवे आहेत, पाणी आहे म्हणजे हे वापरायला पैसे मोजावे लागत असणार असाही काही जणांचा समज होता. त्यांना आवश्यक ती माहिती पुरवत संडासाकडे वळवणे हे काम सुरवातीला अवघड वाटलेच. आम्ही किती काही सांगितले तरी काही चुकार मंडळी उघड्यावर अंधाराकडे निघायचीच. मग शिट्टीचा प्रयोग करणे अपरिहार्य व्हायचे. शिट्टीला बिचकून बरेच जण संडासची वाट धरायचे तर काही शिट्टीलाही न जुमानता अंधारात उघड्यावरच नैसर्गिक विधी उरकायचे. हळूहळू आमची शहरी मनं या सगळ्या प्रकाराला रुळायला लागली. मध्यरात्रीनंतर साधारण दीडच्या सुमारास स्टॅंडला जाग यायला लागली. स्टॅंडच्या आसपासच्या परिसरात काही दिंड्या उतरल्या होत्या. तिथल्या माऊलींही पाण्याच्या शोधात स्टॅंडकडे येऊ लागल्या. आमचीही भीड आता कमी झाली होती. वीसपंचवीस फुटांच्या अंतराने प्रत्येकजण उभे राहून सर्व माऊलींना संडास वापरण्याच्या सूचना द्यायला लागलो. संडासकडे गर्दी दिसायला लागली. आपला नंबर कधी लागणार असा विचार करूनही काही जणं आम्हाला चुकवून अंधारात उघड्यावर विधी उरकत होते. पण ती संख्या खूपच कमी होती. हा माणसांचा ओघ पहाटे चार-साडे चार पर्यंत चालूच राहिला. काही माऊलींनी आमची विचारपूसही केली. शिवाय “सरकारने ही चांगली सोय केली आहे. ८-९ वर्षांपूर्वी फार वाईट परिस्थिती होती. तुम्ही चांगलं काम करताय” वगैरे कौतुकाचे बोलही ऐकायला मिळाले तेव्हा रात्रभर केलेल्या जागरणाचा शीण साहजिकच कमी झाला. थोडी विषण्णता आणि बरंचसं समाधान घेऊन आम्ही पहाटे पाचच्या सुमारास स्टॅंड सोडला.

दीड-दोन लाख वारकरी दर वर्षी पायवारी करतात. हा प्रवास सोळा सतरा दिवसांचा असतो. त्यात माऊलींना मोठ्या प्रमाणावर अन्नदान, शिधावाटप, इतर अनेक गरजेच्या वस्तूचं वाटप वर्षांनुवर्षं होत आलं आहे. निर्मल वारी उपक्रमातून सरकारने आता माऊलींना नैसर्गिक विधींसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. समाजाच्या सवयी हळूहळू बदलतात. तोवर प्रबोधन आवश्यकच असते. त्यामुळे अजून काही वर्षंतरी निर्मलवारीत स्वयंसेवकांची आवश्यकता भासणारच. ही आगळेवेगळे अनुभव घेण्याची संधी सोडायची नाही. ही सुद्धा एकप्रकारची माऊलींची सेवाच आहे. शक्य तेवढी करावी आणि अनुभवाची शिदोरी जमवत जावी.

राम कृष्ण हरी!🙏🙏🙏

-गौरी पेंडसे


Previous post

सेवा सहयोगसोबतचा माझा प्रवास: माझा अनुभव

Next post

निर्मलवारी – स्वयंसेवा अनुभव

Subscribe to our blog