Back to Blog

प्रेरणादायी  मुलाखत: योगिता आपटे

November 27, 2020

सौ. योगिता आपटे या २५ वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करतात. कुटुंब व बालकल्याण ह्या विषयात MSW (Master in Social work) ही पदवी घेऊन १९९५ पासून कार्यरत आहेत. सध्या Persistent Foundation येथे CSR Head म्हणून काम पाहतात. व महिलांविषयी काम करण्यात त्यांना विशेष रुची आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभव, कार्य याविषयी व काही अवांतर गप्पा 

https://www.youtube.com/watch?v=iLSPT3dyRig&t=408s

तुम्ही मूळच्या कुठल्या ? बालपण कुठे गेलं ? लहानपणीच्या काही आठवणी सांगाल का ?

मी पुण्याची आहे आणि माझं बालपण हे पेठेत गेलं. आम्ही वाड्यात राहायचो घरी आई बाबा आणि आम्ही तिघी बहिणी असे आमचे कुटुंब. काका, मामा, आत्या, मावशी अशा सगळ्या नातेवाईकांचे घरी नियमितपणे येणे जाणे असायचे. नातेवाईकांकडून “घरात तिन्ही मुलीच” असण्यावरून गंमतीत का होईना पण बोललेलं आम्हाला ऐकू यायचं, पण माझे आजोबा महर्षी कर्वे यांच्या शाळेत शिक्षक होते. त्यामुळे घरात दोन्हीकडच्या आजी आजोबांनी आई वडिलांनी सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारे ते जाणवू दिले नाही. आम्हाला जसं त्यांनी जोपासलं, जसं वाढवलं त्या सर्व प्रक्रीयेमध्ये आम्ही कोणाही पेक्षा कमी आहोत ही जाणीव कधीच मिळाली नाही. आणि म्हणूनच आज आम्ही जे मिळवू शकलो ते त्यांच्यामुळेच असं मला वाटतं. 

  लहानपणी खूप दंगा मस्ती केली, आई बाबांचा मारही खाल्ला, मार खाल्ला पण तो चांगल्या गोष्टींसाठी होता. आता ते आठवले की असं वाटतं की, हो! ते चांगल्यासाठीच होतं आणि त्यांनी योग्य वेळेला योग्य वाटेवर आणलं, त्यामुळेच आपण पुढे जाऊ शकलो.

मी शाळेत अभ्यासात खूप काही हुशार किंवा खूप मार्कांनी पास होणारी मुलगी नव्हते. १० वी ची परीक्षा जेव्हा दिली, तेव्हा मात्र मला लक्षात आलं की आपला आपण अभ्यास करायचा असतो. आपल्याला पुढे जर काही करायंच असेल तर अभ्यासाव्यतिरिक्त काही पर्याय नाही. कोणी आपल्यासाठी काही वाढून ठेवलं नाहीये, की ज्याच्या जोरावर आपण मोठे होऊ. आपलं शिक्षण आणि आपलं व्यक्तिमत्व या दोनच गोष्टी आपल्याला साथ देतील. त्यानंतर मात्र मी परत मागे वळून बघितलं नाही. मी जे काही करत गेले त्यात घरच्यांनी पण साथ दिली. मला ज्याची आवड होती ते करत गेल्यामुळे त्याचा मला आनंदच वाटत आला आहे. 

तुमच्या लहानपणीच्या दिवाळीबद्दल सांगाल का ?

दरवर्षी आम्ही किल्ला करायचो, खेळणी आणायचो, फटाकेपण उडवायचो. पण फटाके कुणाला किती मिळणार ते ठरलेलं असायचं. फटाके ४ दिवस पुरवायचे, त्यात पण मैत्रिणी, इतर भावंड यांच्याबरोबर उडवायचे तेंव्हा असं बोलून नाही चालायचं की “बाबांनी माझ्यासाठीच आणलेत मी देणार नाही”. म्हणून मग त्याचं नियोजन करायला लागायचे. पहिल्याच दिवशी सगळे फटाके उडवून मोकळे झालो तर चालायचं नाही. कारण आम्ही जे मागू ,जे म्हणू ते मिळायचं अशी आमची परिस्थिती तेव्हा नव्हती. त्या परीस्थिची जाणीव आई बाबांनी नकळतपणे करून दिली, आणि त्या जाणीवेने आम्हाला खूप काही शिकवलं, त्यातून जास्त उभारी आली. नकळतपणे लहानपणी जे संस्कार झाले त्यामुळे “जे आज नाही मिळाले पण ते उद्या नक्की मिळेल” हा जो विचार दिला. त्यामुळे एखाद्या गोष्टीसाठी मेहनत घ्यायची हे त्यातून समजलं. दिवाळीमध्ये फराळाचे सगळे पदार्थ आई घरीच करायची. मी त्यात मदत करावी असा तीचा आग्रह असायचा. पण मी कधी स्वयपाकघरात रमले नाही. हे नक्की शिकले की घरातली जवाबदारी पार पाडता आली पाहिजे, आणि तेवढ्याच आत्मविश्वासाने बाहेरही वावरता आले पाहिजे. उधळ माधळ करू नये, साठवून ठेवणे, नियोजन करणे या सगळ्या गोष्टी मी आई बाबांकडून शिकले.

तुमचं महाविद्यालयीन शिक्षण कुठे झाले ? त्याचे निर्णय कसे घेतले ?

: आताच्या मुलांना जेवढी पुढे जाऊन काय करायचं ? याची स्पष्टता असते, तेवढी मला नव्हती. पण ढोबळमानाने आपल्याला काय करायचं हे माहिती होतं. माझे आजोबा शिक्षक होते आणि माझी प्रेरणाही ! म्हणून मग त्यांच्यासारखं शिक्षक व्हावं असं एक वाटायचं, दुसरं म्हणजे मला समाजकार्याची ओढ होती. कारण मी १० वीला असतांना शाखेमध्ये जात होते. तेव्हा पासून तो प्रवास सुरु झाला की आपण या क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी नेमकं काय शिक्षण घेता येईल हे बघुयात, आणि तिसरी गोष्ट माझ्या मनात होती की पोलीस व्हायचं. म्हणून मी एस.पी. महाविद्यालयात आर्ट्स शाखेत प्रवेश घेतला. प्रवेश प्रकिया तेव्हा सोपी होती फक्त मार्कशीट दाखवून आणि ८५० रु. फी भरून झाली आणि  कॉलेज सुरु झाले. 

शाळेमध्ये मी दंगेखोर प्रवृत्तीची होती, कॉलेजमध्ये काही वेगळं करायला मिळेल असं वाटलं. आणि झालंही तसंच, आम्हाला विषय निवडायचे होते त्यामध्ये मी NSS (National Service Scheme) हा विषय निवडला. यामध्ये शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बरोबरीने सामाजिक काम उभं केलं जातं. त्याचा भाग होऊयात असं ठरवलं, त्यानंतर पूर्ण ५ वर्ष मी NSS मध्ये होते. त्यामधून वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेतला. जसे की पुण्याच्या कोंढवा हॉस्पिटलमध्ये जाऊन एखादा रंगारंग कार्याक्रम सादर करणं, त्यात लावणी म्हणणे, नाच करणं यापासून ते त्यांच्याबरोबर वृक्षारोपण करणं, सफाई अभियान राबवणं, प्रौढ साक्षरता वर्ग घेणं, असे अनेक उपक्रम केले. 

या सर्व सामाजिक कामाबरोबर मी कॉलेजमध्ये खूप मजापण केली. तास बुडवून सिंहगडावर फिरायला जाणे, अलका टॉकीजला सिनेमा बघायला जाणे. पण जे विषय आवडायचे त्या विषयाचे तास कधीच चुकवले नाही. अगदी वर्गात जागा नसायची तेंव्हा मागे उभं राहून ते ऐकायचो. 

 हे सगळं करताना मी जे काही दिवसभरात केलं ते जसेच्या तसे घरी येऊन आईला सांगायचे. त्यामुळे काहीही करताना माझ्या मनात भीती नव्हती. कारण जे करते त्यातून माझ्यावर काही प्रसंग ओढवला तर कोणी हा प्रश्न विचारणार नाही की तू तिथे काय करत होतीस? मी फक्त एकदाच आईला खोटं बोलले होते. आईला हे माहित होतं, की मी सिंहगडावर जाणार आहे, पण टू-व्हीलर वर जाणार हे माहित नव्हतं. आईने सांगितलं होतं गाडीवर जाऊ नको, बसने जा. आम्ही ऐकलं नाही आणि आमचा अक्सीडेंट झाला. मला प्रचंड लागलं इतकं, की मी पुढचे ३ महिने नीट चालू शकत नव्हते. त्यामुळे माझा हा विश्वास दृढ झाला की मी एकदाच अर्ध खरं सांगितलं आणि तेंव्हा हे असं झालं. त्यानंतर आजपर्यंत अशी कोणतीही गोष्ट नाही की जी मी केली आणि ती कुटुंबापासून लपवली आहे. 

MSW आणि सामाजिक कार्याची सुरुवात कशी झाली ?

NSS मध्ये अनेक कॅम्प्स असायचे, माझे ५ वे वर्ष असताना एका कॅम्पमध्ये सामाजिक काम करणाऱ्या एक ताई आलेल्या त्या ससूनमध्ये काम करायच्या. तेथे येऊन त्यांनी त्यांच्या कामाचं स्वरूप सांगितलं तेंव्हा आम्ही त्यांना विचारलं की तुमचं काय शिक्षण झालंय ? तेव्हा मला MSW ची माहिती मिळाली. त्यावेळी पुण्यात फक्त कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये MSW शिकवलं जात होतं. त्यांची प्रवेश परीक्षा असायची, तेंव्हा हे आमच्यासाठी नवीन होतं. मग त्यात नक्की काय प्रश्न विचारतील ? त्याची तयारी काय केली पाहिजे ? याची भीती वाटत होती. तेंव्हा तिथे ४ विषयांमध्ये विशेषज्ञता (Specialization) होती. प्रत्येक विशेषज्ञतेसाठी २० मुलांची जागा होती. महाराष्ट्रभरातून शेकडो मुलांनी अर्ज दिले होते. इथे मला NSS चा फायदा झाला तो असा की, Republic Parade मध्ये भारतातील सर्व राज्यांमधून ४ ते ५ प्रतिनिधी निवडतात. ज्यांना महिनाभर एकत्र राहायची आणि २६ जानेवारीला राजपथ येथील परेडमध्ये संधी मिळते. तिथे आम्हाला वेगवेगळ्या उपक्रमातून खूप शिकायला मिळालं. देशभरात नक्की काय चाललंय? काय काय विचार आहेत ? संस्कृती काय असते ? आणि आपली मतं कशी मांडावीत हे समजलं. मी तिथे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्त्व केलं. त्यातून मला आत्मविश्वास मिळाला आणि जवाबदारीची जाणीवही झाली. आपण जे बोलू त्यावरूनच आपलं परीक्षण होणार हे तेंव्हा कळलं. तेव्हा समाजमाध्यमे एवढी प्रगत नव्हती त्यामुळे आपल्यावर एक जवाबदारी आहे, आपण आपल्या राज्याचं प्रतिनिधित्त्व करतो त्यामुळे एक चांगली प्रतिमा झाली पाहिजे. 

ह्या सगळ्या अनुभवातून मला MSW च्या परीक्षेला मदत झाली. पुढे मी फॅमिली अँड चाईल्ड वेल्फेयर (FCW) मध्ये विशेषज्ञता मिळवण्यासाठी प्रवेश घेतला. माझं नशीब! माझे जे सर्व प्राध्यापक होते ते त्यांच्या क्षेत्रातील हुशार माणसं होती. त्यांनी स्वतःच्या पदरी काही न ठेवता जे काही शिकवता येईल ते सगळं आम्हाला भरभरून शिकवलं. ते नेहमी सांगत हि पदवी म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा तुम्ही शिकायला लायक आहात याचा परवाना होय. तुमच्यामध्ये अजून अशी क्षमता नाही की तुम्ही जग बदलून टाकाल. प्रवेश घेताना आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की आम्ही आता सामाजिक कार्यकर्ते होणार म्हणजे आपण जग बदलून टाकणार. हा विचार कमी करायचं काम त्यांनी या दोन वर्षात केलं. बदल हा स्थायीभाव आहे आणि तो निश्चित घडणार पण ते करण्याची ताकद सध्या तुमच्यात नाही. तुम्ही त्याच्या पहिल्या पायरीवर आहात हि जाणीव दिली. याचा फायदा म्हणजे आजपण काम करत असतांना आपण काय देतोय यापेक्षा आपल्याला काय शिकायला मिळतंय हि वृत्ती त्याच्यामुळेच तयार झाली. 

   दोन वर्षामध्ये क्षेत्र कार्य (Field Work), अभ्यास दौरा (Study Tour), शोधनिबंध (Research Paper) अशी खूप धमाल केली. साडी नेसायला आणि ती वागवायला MSW मुळे शिकले. आठवड्यातून २ दिवस जिथे क्षेत्र कार्य असेल तेथे साडी नेसावी असा तिथे नियम होता. हा अभ्यासाचा एक भाग होता की आपण ज्या ठिकाणी क्षेत्रकार्याला जातो तिथे आपली वेशभूषा कशी असली पाहिजे ? या सगळ्याची जाणीव झाली. 

नोकरी आणि पुढील प्रवास याबद्दल सांगा ना ?

नोकरी मिळेल का नाही ? कुठे मिळणार ? शोधायची कशी ? असे प्रश्न पडले होते. आधी मी ज्यांच्याकडे Internship केली होती, त्याच संस्थेत मला परत बोलावलं. पण मी फार काळ तिथे रमले नाही. विद्यार्थी म्हणून काम करणे आणि संस्थेचा एक भाग म्हणून काम करणे हा फरक कळला. तेथील काम करायची पद्धत मला फारशी भावणारी नव्हती त्यामुळे मी नोकरी सोडली. लगेचच मला दुसऱ्या संस्थेत नोकरी मिळाली जिथे मी जवळपास साडेपाच सहा वर्षे वस्तीपातळीवर काम केलं. महिला मुले यांचे गट करणं, आरोग्याविषयी काम करणं, ते काम मोठं करत महाराष्ट्रभरात कसं  नेता येईल ? याचं काम केलं. 

    काम करत असताना महिलांसाठी काम करावं असं वाटू लागलं. वस्तीपातळीवर काम करत असताना वाटत होतं की घरातील महिलेला ताकद दिली तर घरातील बऱ्याच गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. म्हणून मग एका कौटुंबिक हिंसाचारावर काम करत असणाऱ्या संस्थेत १० वर्षे काम केलं. ती संस्था पोलिसांबरोबर काम करत होती. सिस्टमचा एक भाग म्हणून काम करण्याची माझी एक सुप्त इच्छा इथे पूर्ण झाली. त्यामधून मला खूप शिकायला मिळालं. मी किती नशीबवान आहे हे काम करायची ताकद मला घरातून मिळत होती.  

या सगळ्यासाठी देणग्या देणाऱ्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांना या सगळ्या परिस्थितीची हवी तितकी जाणीव नाही असे माझ्या लक्षात आले. त्या लोकांना जाणीव असेल तर या क्षेत्रात अजून पैसा आणून मदत मिळवू शकतो. ज्यामुळे जास्त परिणामकारक काम करता येईल. पैशाबरोबर माणसं जोडणं हे पण गरजेच वाटू लागलं. कारण माणूस कार्यकर्ता म्हणून येतो तेंव्हा तो त्याचे अनुभव, कौशल्ये घेऊन येतो. हे करण्यासाठी आपण काय करू शकतो म्हणून corporate क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं. TATA motors मध्ये काम केलं आणि आता Persistent मध्ये कार्यरत आहे. 

Persistent मधील कामाचे स्वरूप नेमकं कसं आहे?

CSR मध्ये एका कंपनीची सामाजिक बांधिलकी या कायद्याने पण बंधन आणले आहेत की कंपनी कुठे काम करते? काय काम करते? त्यावर किती पैसे खर्च करते ? हे सांगणं खूप गरजेच आहे. Persistent हे काम आता भारतात ५ ठिकाणी काम करत आहे. याबरोबर अजून काही सामाजिक संस्थांशी संपर्क येत असतो. या संस्थांबरोबर असणारे प्रकल्पनिहाय संबंध, त्यांची आखणी, नियोजन, प्रत्यक्ष अंमलबजावणी बघणे, प्रत्येक टप्प्यावर त्याची देखरेख करणे, अजून काय काय उपाययोजना लागतील हे बघणे. जसे की covid ची परिस्थिती निर्माण झाली, तेंव्हा आम्ही वेगवेगळ्या आरोग्याशी निगडित असलेल्या संस्थांबरोबर काम करत असताना त्यांना covid शी संबंधित काय काय सहकार्याची गरज आहे हे सगळं बघणं. त्या दृष्टीने काम करणं हा एक भाग झाला जो कामाशी निगडीत आहे. दुसरा म्हणजे डॉक्युमेंटेशन, आपण जे सगळं काम करतो आहोत ह्या सगळ्याची नोंदणी ठेवणं. ही नोंदणी दोन प्रकारची असते, एक त्यांच्यासाठीची जे कंपनीमध्ये पैसे इन्वेस्ट करतात, दुसरी त्यांच्यासाठीची जे कंपनीमध्ये काम करणारी लोक आहेत आणि तिसरी सरकारदरबारी यांची नोंद होत असते. जेव्हा कंपनी असं म्हणते की आम्ही आमच्या नफ्यामधला दोन टक्के पैसा खर्च केला. तर तो अशाच ठिकाणी खर्च केला ना ? ज्या ठिकाणी तो गरजेचा होता. का अशा ठिकाणी केला ज्यातून तुमच्या व्यवसायाला फायदा होणार आहे. याची तपासणी होत असते आणि त्यावरून तुमची मानांकन ठरत असतात. त्यामुळे अशा विविध स्तरांवरच काम एक विभाग प्रमुख म्हणून करावं लागतं.

तुमचं कुटुंब त्याचा सामाजिक कार्यामध्ये कुटुंबाचा सहभाग कसा असतो ?

मी, माझे पती आणि मुलगी आम्ही तिघे राहतो. माझ्या बहिणी पुण्यात आहेत, माझे दीर कोकणामध्ये आहेत, काका आहेत, माझी आई आहे. जरी आम्ही वेगवेगळे राहत असलो तरी आमचे एकमेकांचे नातेसंबंध खूप घट्ट आहेत. माझ्या कामाविषयी जर बोलायचं झालं तर माझी मुलगी जेव्हा लहान होती तेव्हा तिला फारसं माझं काम आवडायचं नाही. कारण तेव्हा असं व्हायचं की माझा कामामुळे खूप वेळ बाहेर राहावं लागत होतं. माझा खूप मोठा मानसिक वेळ माझ्या कामात जायचा. त्यामुळे तिच्याकडे कधीतरी दुर्लक्ष व्हायचं. पण जशी ती मोठी झाली तिला आज तिच्या आईच्या कामाचा खूप अभिमान आहे. ती माझी शक्ती आहे. माझ्या पतींनी काम करतांना मला काम करण्याबद्दल कधी अडवलं नाही किंवा तू हे का करतेस ? याबद्दल कधी अडवलं नाही. माझ्या प्रत्येक कामामध्ये माझ्याबरोबर राहिले. ते माझी प्रचंड मोठी सपोर्ट सिस्टम आहेत. मी अनेकवेळा ज्या नोकऱ्या बदललेल्या आहेत. त्सुनामी रिलीफ वर्कमध्ये काम केलं. covid मध्ये काम केलं आहे. घराच काय होईल ? असा प्रश्न माझ्या मनात कुठल्याही प्रसंगाच्या वेळेला कधी उमटला नाही. त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या पतींना आहे. कारण तुम्ही तेव्हाच अत्यंत मनमोकळेपणाने जगू शकता जेव्हा तुमच्या पाठीमागे काही विवंचना नसते. तुम्हाला माहिती असतं की काहीही घडलं तरी कुणीतरी माझ्या पाठीमागे आहे की जे मला कधी एकटं पडू देणार नाही. अशी माझी सपोर्ट सिस्टिम खूप मजबूत आहे. मी अजूनही माझ्या आईशी तेवढ्याच गप्पा मारते, अजूनही तिला माहिती असतं की माझ्या आयुष्यात काय घडतंय ? आजच्या या मुलाखतीबद्दलपण मी आज सकाळी तिला सांगितलं होतं. तेव्हा तिने मला सांगितलं होतं की नीट बोल. माझी बहिण ही सुद्धा माझी खूप मोठी ताकद आहे. माझं लहानपण ज्यांच्या बरोबर मी अनुभवलं त्या अनुभवातून आम्ही तिघी आज मोठ्या झालेल्या आहोत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहोत. मी सामाजिक कार्यकर्ती आहे, माझी  दुसरी  बहिण ट्रॅव्हल अँड टुरिझममध्ये आहे आणि तिसरी बांधकाम क्षेत्रामध्ये आहे, माझे पती शेतीव्यवसायात काम करतात आणि माझी मुलगी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आहे. त्यामुळे आमचं जर संपूर्ण कुटुंब पहिलं तर  बहुतेक आमच्या कामामुळे आम्ही आमच्या कुटुंबातला एकसुरीपणा टाळू शकलेलो आहोत. प्रत्येक जण बाहेर काहीतरी वेगळं करतं आणि प्रत्येक जण घरात बाहेरून काहीतरी वेगळा अनुभव घेऊन येतं, जो एकमेकांना समृद्ध होण्यासाठी मदत करतो. मला वाटतं या covid च्या काळामध्ये आम्हाला त्याच गोष्टींनी तारलं असावं. कारण आपल्याला सवय नव्हती या प्रकारच्या वातावरणाची आणि आजूबाजूच्या सारख्या त्या बातम्या, बाहेर सारखे वाजणारे अॅम्ब्युलन्सचे आवाज, या सगळ्या कालावधीमध्ये स्वतःची मानसिकता नॉर्मल ठेवणं हेच खूप मोठं आव्हान होतं. ते फक्त तेव्हाच राहू शकतं जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या गरजा ओळखू शकता आणि त्यानुसार वागू शकता. मला असं वाटतं की या सगळ्या कालावधीमध्ये छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद घ्यायला आम्ही शिकलो आणि एकमेकांबरोबर राहायला पण covid मुळे शिकलो. तर माझं कुटुंब ही माझी ताकद आहे असं मला फार ठामपणे वाटतं आणि माझ्या मते ती प्रत्येकाचीच असते.

सामाजिक कार्यकर्ता म्हणून काय करायला हवं आणि काय करू नये?

आत्तापर्यंतच्या माझ्या कामाच्या अनुभवावरून एक गोष्ट माझ्या मनात कायम असते कि, आताची ही सगळी परिस्थिती बदलण्याची शक्ती मला दे. काही गोष्टी आहेत ज्या मी बदलू शकत नाही ती मान्य करण्याची वृत्ती मला दे. आणि तिसरं ह्या दोन्हीतला फरक समजण्याची बुद्धी दे. मी कॉलेजमध्ये असल्यापासून हे सतत मनावर बिंबवत आलेली आहे. कारण असं की, आज मी एखादी गोष्ट करते उद्या तीच असेल असं नाही. म्हणजे आज माझी जी मानसिकता आहे ती बदलूही शकते. आपण माणूस आहोत त्यामुळे आपल्यालाही कधीतरी राग येणार, वाईट वाटणार. हे सगळं स्वाभाविक आहे सामाजिक कार्य करत असतांना तुम्हाला येणारे अनुभवच तसे आहेत की कधीतरी ते खूप मनाला समाधान देणारे असतील. आणि कधी अनपेक्षितपणे धक्का देणारे असतील. अशा वेळेला ते भान ठेवणं हे खूप गरजेचे आहे. दुसरं मला असं वाटतं की आपण सतत मी काय देऊ शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. पण मी यातून काय शिकू शकतो याचंही भान ठेवणं गरजेचं आहे. आज एखादी गोष्ट जमली नाही, आज एखादी गोष्ट करता आली नाही किंवा आज अपेक्षित परिणाम मिळाला नाही ठीक आहे. आज संपणार आहे आणि उद्या येणारच आहे. कारण बदल ही अटळ गोष्ट आहे. हे जर आपण मान्य केलं, हे तुम्ही सतत तुमच्या मनाशी बोलत राहिलात तर तुम्ही त्यादृष्टीने विचार कराल. दुसरं तुम्ही त्यादृष्टीनी तुमची आजूबाजूची साधनसंपत्ती शोधायला लागता. म्हणजे ते म्हणतात ना हिंदी सिनेमातला तो प्रसिद्ध संवाद “अगर आप किसी चीज को शिद्दत से चाहो तो पुरी कायनात आपके साथ हो जाती है !”  म्हणजे तुम्ही त्यादृष्टीने आजूबाजूच्या परिस्थितीकडे  बघायला लागता म्हणून त्या गोष्टी तुम्हाला सापडतात. त्यामुळे मला असं वाटतं की कार्यकर्ता म्हणून आपण नेहमी  हे एक भान ठेवावं की काम करत असताना मला आनंद मिळतोय का ? आणि मी दुसऱ्या कुणाचं नुकसान करत नाही ना ? त्या गोष्टीचा अपेक्षित परिणाम मला मिळाला की नाही मिळाला ही बाब दुसरी आहे. त्याविषयी विचार करता येऊ शकतो, परिणामकारकता वाढवता येऊ शकते. पण कामाच सातत्य टिकवायचं असेल तर मात्र आपल्याला त्या कामातून आनंद  मिळतो आहे की नाही हे आपण बघितलं पाहिजे. जर का त्या कामातून आपल्याला आनंद मिळत नाहीये तर शोधलं पाहिजे की का आनंद मिळत नाहीये ? असं काय आहे ? जे आपल्याला खुपतंय. 

विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी करोनाच्या स्थितीमध्ये काय केलं पाहिजे ? या बद्दलचे मार्गदर्शन 

मी मागच्याच आठवड्यात घराजवळच्या एका मुलीशी बोलत होते. तिने आत्ताच दहावीची परीक्षा दिली. मी तिला विचारलं तू आता काय करतीयेस? ती म्हणाली काही नाही. मी म्हणलं ऑनलाईन क्लास वैगेरे करत नाही का? ती म्हणली नाही. आत्ता कॉलेज सुरु नाही त्यामुळे पुढच्याच वर्षी अकरावीला प्रवेश घेईन असं मी ठरवलं आहे. यावर्षी अकरावीला प्रवेशच घेणार नाही. मी तिला विचारलं मग आता काय करतेस ? ती म्हटली काही नाही नृत्य शिकतीये. मी विचारलं अजून काय करतेस? ती म्हणाली छोट बाळ आलंय घरात त्याच्याशी खेळते आणि घरात आईला मदत करते. दुसरा एक मुलगा ज्याला मी खूप जवळून ओळखते तो क्लासेस करतोय. स्पर्धा परीक्षांची तयारी करतो आणि अत्यंत मनापासून अभ्यास करतो. दर रविवारी परीक्षा देत असतो. या दोन्ही परिस्थितीमध्ये मी जसं म्हणलं तसं त्यांचं  कुटुंब त्यांच्यासोबत आहे. त्यांचे पालक त्यांनी घेतलेल्या निर्णयाला साथ द्यायला त्यांच्या सोबत आहेत. त्यांनी जे ठरवलं ते ती मुलं मनापासून करतात. त्यामुळे तुम्ही अभ्यासच केला पाहिजे, तुम्ही क्लासेस केले पाहिजेत, किंवा तुम्ही पुस्तकाचा किडाच झाला पाहिजे का ? तर असं काही नाही. तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा. त्यामध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी प्रयत्न करा. हे जे एक वर्ष आहे हे म्हणजे तुमचं करिअर आहे असं नाही. या वर्षामध्ये चुकुन कमी मार्क पडले तर ठीक आहे. जर पन्नास ते साठ या श्रेणीमध्ये असणारी एक मुलगी आज इथे बसून जर मुलाखत देऊ शकते. तर तुम्ही, तुमची पिढी नक्की आमच्या पिढीपेक्षा कुशल आहे. त्यामुळे एखादं वर्ष हातातून गेलं म्हणून आयुष्यात मी काही करू शकणार नाही किंवा आपल्या मुलाचं मोठं नुकसान झालंय असा विचार करून त्याच्यावरती दडपणही आणू नका. पण हे देखील तितकंच खरं आहे की मग काहीच करू देऊ नको का त्याला? नुसताच रिकामा बसु देऊ का ?  टी.व्ही बघु देऊ का ? तर असं नाही. काहीतरी कौशल्य वाढवण्यासाठी त्याला निश्चित मदत करा. ते कौशल्य घरातल्या स्वयंपाकापासून ते स्वतःच्या आवडी निवडीपर्यंत काहीही असू शकेल. किंवा जर का त्याने ठरवलं की मला पुढे शिक्षण घ्यायचं, मला पुस्तकं आणून द्या माझा मी स्वतः अभ्यास करतो. तर तो जे काही करेल ते त्याला मनापासून करण्यासाठी वातावरण निर्माण करणं हे माझ्या मते प्रत्येक पालकाने करावं आणि प्रत्येक विध्यार्थ्याने हे ठरवावं की आपल्याला काय करायचं ? 

दिवाळी अंक ही संकल्पना कशी वाटली ?

ही संकल्पना खूप चांगली आहे कारण मला व्यक्त होण्याची एक संधी या निमित्ताने मिळाली. असं म्हणून मुलं या मंचाचा वापर करणार आहेत. दुसरं म्हणजे तुम्ही दोन्ही पद्धतीने प्रकाशन करत आहात. म्हणजे एखादा मुलगा कॅमेरा चांगला वापरत असेल तर शक्यता आहे तो तुम्हाला त्याची एखादी कथा, एखादा नाच किवा नृत्य असं काहीतरी रेकॉर्ड करून दिवाळी अंकासाठी पाठवेल. एखादी मुलगी उत्तम गोष्ट लिहिते, कविता लिहिते तर ती तुम्हाला काहीतरी लिहून पाठवेल. त्यामुळे दोन्ही प्रकारे तुम्ही प्रकाशन करत आहात हि गोष्ट खूप अभिनंदनाची आहे. त्या निमित्ताने हि एक संधी आहे म्हणून त्याचा वापर करा. नाहीतर दिवाळी अंक म्हटलं की तो प्रकाशित झाला पाहिजे आणि तो लिखित या स्वरुपात पाहिजे या चौकटीला छेद देणारा दिवाळी अंक म्हणून डिजिटल दिवाळी अंक म्हणून आपण एकतो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहोत. कधी कधी दुसऱ्याच बघून आपल्याला असं वाटतं की आपल्याला हे जमेल की नाही. पण जेव्हा मी माझ्याच वयाच्या, माझ्याच वस्तीतल्या एखाद्या मुलीला दिवाळी अंकामध्ये काहीतरी सादर करताना त्या चॅनल वरती बघते तर शक्यता आहे की ही गोष्ट मलाही काहीतरी नवीन करण्याचा आत्मविश्वास देऊन जाईल. अगदी मी काहीतरी प्रदर्शित करू शकेन असं नाही पण मी तो प्रयत्न तरी करायला लागेल. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक प्रेरणा देणारा प्रयोग म्हणून याच्याकडे बघावं. ज्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या मुलाखती घेतलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या आहेत तर तो एक अत्यंत समृद्ध अनुभव देऊन जाईल. पालकांना, इतर वाचकांना आणि माझ्यासारखे जे सेवा सहयोग सोबत काम करतात अशा लोकांना पण हे वेगवेगळे अनुभव आहेत. कारण सेवा सहयोग सोबत काम करत असताना तुम्ही समाजातल्या खूप वेगवेगळ्या घटकांच्या बरोबर जोडलेले आहात. जेवढ्या वेगवेगळ्या घटकांसोबत काम करण्याची संधी मला एक विभाग प्रमुख म्हणून मिळत नसेल तर ती एक संधी मला संस्थेच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून मिळत आहे. आज मी काही करू शकत नाही पण किमान मी तो अनुभव ऐकु तरी शकते.

Tags:
interview

Previous post

प्रेरणादायी मुलाखत: निलेश धायरकर

Next post

सेवा सहयोग ब्लॉग

Subscribe to our blog